टोळी युद्धातून पुण्यात आणखी खून पडणार?
शनिवारी दुपारी कोंढवा-कात्रज परिसरात गणेश काळेची गोळ्या घालून आणि नंतर कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. गणेश काळे हा वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी समीर काळेचा भाऊ आहे. वनराजची हत्या करताना समीर काळेनं आपल्या काही साथीदारांसह मध्यप्रदेशातून बंदूका आणून आरोपींना पुरवल्या होत्या. आता आंदेकर टोळीने समीर काळेच्या भावाला टार्गेट केलं आहे.
advertisement
यापूर्वी गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरची नाना पेठेत गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात बंडू आंदेकर आणि त्याचे २० हून अधिक साथीदार सध्या राज्यातील वेगवेगळ्या कारागृहांमध्ये आहेत. असं असतानाही टोळीयुद्धातून पुण्यात दुसरा मर्डर पडला आहे. त्यामुळे जेलमधूनच 'बदला' घेण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.
बंडू आंदेकरची शपथ, तुरुंगातून बदला घेण्याची तयारी
खरं तर, ज्यावेळी वनराज आंदेकरचा खून झाला होता. तेव्हा आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर आणि इतर साथीदारांनी या खुनाचा बदला घेण्याची शपथ घेतली होती. यासाठी बंडू आंदेकरने वर्षभरापासून तयारी केली होती. तो स्वतः अटक होणार हे गृहीत धरून, त्याने टोळीतील काही जणांवर पुढील जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या आणि यासाठी मोठी आर्थिक रसद पुरवली होती. त्यामुळे आंदेकर टोळीतील मुख्य लोक जेलमध्ये असले तरी त्यांच्या कारवाया बाहेरून सुरू आहेत, असा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे.
विशेष म्हणजे आयुष कोमकरची हत्या करण्यापूर्वी आंदेकर टोळीने आंबेगाव परिसरात वनराज खून प्रकरणातील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाडच्या घराची रेकी केली होती. त्याचे कुटुंबीय आंदेकर टोळीच्या टार्गेटवर होते. याबाबतची गुप्त माहिती मिळाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या. आता पुन्हा एकदा सोमनाथ गायकवाडच्या कुटुंबामधील कुणाला तरी टार्गेट केलं जाऊ शकतं, असा अंदाज पोलीसांकडून वर्तवला जात आहे.
पोलीस यंत्रणा अलर्टवर
वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपींच्या कुटुंबातील दोन व्यक्तींचे (आयुष कोमकर आणि गणेश काळे) खून झाले आहेत. हे खून योगायोग नसून, सूडबुद्धीने करण्यात आले आहेत, असा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे येत्या काळात टोळीयुद्ध अधिक तीव्र होण्याची आणि आणखी खून होण्याची भीती व्यक्त होत आहे. या सर्व घटनांमुळे गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांना सतर्क झाल्या आहेत
