खाजगी आणि अवजड वाहनांसाठी प्रवेश बंदी
चाकण ते शिक्रापूर मार्गावर काही दिवस सर्व खाजगी वाहनांना दोन्ही मार्गाकडून प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या मार्गावर फक्त अनुयायांच्या बसेसना परवानगी देण्यात आली आहे. मुंबईकडून अहिल्यानगरकडे जाणारी जड वाहने आणि मालवाहतूक ट्रक आता तळेगाव–चाकण मार्गाऐवजी वडगाव मावळ, म्हाळुंगे, खेड आणि नारायणगाव मार्गे वळवली जातील. आळंदी फाटा, मोशी चौक आणि पांजरपोळ परिसरातून जाणाऱ्या अवजड वाहनांवरही पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.
advertisement
अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी वाहतूक मार्ग निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये नाशिककडून येणाऱ्या बसेस चाकण मार्गे शिक्रापूर याठिकाणी पोहोचतील, तर मुंबईकडून जुन्या महामार्गाने येणाऱ्या बसेस वडगाव फाटा–म्हाळुंगे–चाकण मार्गाने नेल्या जातील. हलकी वाहने, आळंदी–मरकळ–तुळापूर मार्गे लोणीकंद पार्किंगकडे वळवली जातील. मरकळ येथील इंद्रायणी पुलावर 8 फूट उंचीचे अडथळे असल्यामुळे, त्यापेक्षा जास्त उंचीची वाहने या मार्गावरून जाऊ शकणार नाहीत, असे पोलिसांनी सांगितले आहे.
पर्यायी मार्ग कोणते ?
MIDC परिसरात या काळात जड वाहनांना अनुयायांसाठी निश्चित केलेल्या मार्गांवर जाण्याची मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे लोणीकंदकडे जाणाऱ्या खाजगी वाहनधारकांनी अलंकापुरम चौक (तापकीर चौक) किंवा चऱ्होली फाटा हे मार्ग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे शहरातून विश्रांतवाडी मार्गे आळंदीकडे जाणाऱ्या वाहनांनाही मज्जाव करण्यात आला असून, त्यांना वाघोली मार्गे लोणीकंदकडे जाणे अपेक्षित आहे. रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या आणि अन्य अत्यावश्यक सेवा वाहनांना या नियमातून सूट दिली जाणार आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाचे सहकार्य करावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे वाहतूक शाखेकडून आवाहन करण्यात आले आहे.






