स्वारगेट भागातील लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाजवळील घटना विशेष चर्चेत आहे. शनिवारी सकाळी महाविद्यालयीन तरुण आपल्या कामानिमित्त बाहेर पडला असता दोन अज्ञात चोरट्यांनी त्याच्याकडील 25 हजार रुपयांचा स्मार्टफोन हिसकावून नेला. अनपेक्षितपणे झालेल्या या घटनेनंतर तरुणाने तत्काळ स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक जाधव यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.
advertisement
दरम्यान, शनिवारी रात्री आणखी एक धक्कादायक घटना समोर आली. पुणे-सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाणपुलाजवळ एका महिलेच्या हातातील मोबाइलवर चोरट्यांनी डल्ला मारला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे महिला घाबरून गेली. तिने तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. या प्रकरणाचीही स्वतंत्रपणे चौकशी सुरू आहे.
गणेशोत्सव काळात शहरात मोठ्या प्रमाणात भाविक आणि नागरिकांची गर्दी होत असल्याने अशा प्रकारच्या गुन्ह्यांना प्रोत्साहन मिळत असल्याचे पोलिसांचे मत आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी सतर्क राहावे, मोबाइल व मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. त्याचबरोबर गस्त वाढवून अशा चोरट्यांना आळा घालण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.