सीसीटीव्ही फुटेजची कसून छाननी
पोलिसांनी या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तातडीने आपली शोधमोहीम सुरू केली. अजय पंडित (23) नावाचा हा तरुण जिथे राहत होता, त्या परिसरातील हालचालींवर पोलिसांची नजर गेली. सीसीटीव्ही फुटेजची कसून छाननी सुरू झाली आणि तिथेच तपासाला पहिली आणि महत्त्वाची दिशा मिळाली. त्या रात्रीच्या किर्र अंधारात अजय एका व्यक्तीसोबत जाताना दिसला. तो दुसरा-तिसरा कोणी नसून त्याचाच चुलत भाऊ अशोक पंडित (35) होता. अशोक हा मूळचा मोशी येथे राहत होता, मग त्या रात्री तो अचानक कात्रजमध्ये काय करत होता? हा प्रश्न पोलिसांना खटकला. संशयाची सुई अशोकवर स्थिरावली आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला अशोकने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला, पण खाकी वर्दीचा हिसका दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला आणि गुन्ह्याचे बिंग फुटले.
advertisement
रागाच्या भरात काटा काढला
चौकशीदरम्यान अशोकने जे सत्य सांगितले, ते अंगावर काटा आणणारे होते. रक्ताचे नाते असूनही मनातील संशयाने द्वेषाचे रूप घेतले होते. एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधांच्या संशयातून आणि जुन्या गैरसमजातून अशोकच्या डोक्यात रागाची आग भडकली होती. याच रागाच्या भरात त्याने अजयचा कायमचा काटा काढायचे ठरवले. दोघांमध्ये वाद झाला आणि संतापाचा उद्रेक झाला. अशोकने धारदार शस्त्राने सख्ख्या चुलत भावावर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात अजय निपचित पडला. पुरावा नष्ट करण्यासाठी अशोकने मृतदेह गुंडाळला आणि कात्रज घाटाजवळील गुजरवाडीच्या निर्जन डोंगराळ भागात नेऊन फेकून दिला.
अखेर अजयचा मृतदेह सापडला
आरोपीच्या कबुलीने पोलीसही थक्क झाले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे आणि त्यांच्या पथकाने तात्काळ त्या डोंगराळ भागात धाव घेतली. काही तासांच्या अथक शोधमोहीमेनंतर अखेर अजयचा मृतदेह सापडला आणि या भयानक गुन्ह्याचा उलगडा झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. एका संशयाने दोन आयुष्यांची राखरांगोळी केली आणि एका निष्पाप जीवाला आपला जीव गमवावा लागला, हेच या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
