प्रशांत जगताप यांना लिहिलेलं एक पत्र
सादिक कपूर यांनी आत्महत्येपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) माजी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना लिहिलेलं एक पत्र समोर आलं आहे. हे पत्र 20 डिसेंबर रोजी लिहिण्यात आलं होतं, ज्यामध्ये त्यांनी आपल्या जीवाला असलेला धोका आणि राजकीय दबावाबाबत गंभीर इशारे दिले होते.
'टिपू पठाण' टोळीचा म्होरक्या
advertisement
या पत्रात सादिक कपूर यांनी थेट आरोप केला होता की, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार फारुख इनामदार (शेख) हा 'टिपू पठाण' टोळीचा म्होरक्या आहेत. फारुख इनामदार यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे लक्ष वेधताना सादिक यांनी तक्रार केली होती की, त्यांच्याकडून प्रचंड त्रास दिला जात आहे. पक्षातील वरिष्ठांनी वेळीच हस्तक्षेप करून फारुख इनामदार यांना रोखले पाहिजे, अशी कळकळीची विनंतीही त्यांनी या पत्राद्वारे केली होती.
30 पानांची सुसाईड नोट
दुर्दैवाने, या पत्रावर वेळीच कारवाई न झाल्याने किंवा परिस्थिती न सुधारल्याने सादिक कपूर यांनी काल टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या 30 पानांच्या सुसाईड नोटमध्ये आणि हातावर लिहिलेल्या मजकुरात पुन्हा एकदा फारुख इनामदार यांचे नाव घेतल्याने आता पोलिसांवरील दबावात वाढ झाली आहे. या पत्रामुळे सादिक आणि फारुख यांच्यातील वाद केवळ जमिनीपुरता मर्यादित नसून त्याला गुन्हेगारी आणि राजकीय पदरही असल्याचे स्पष्ट होत आहे.
राजकीय वर्तुळात मोठी खळबळ
दरम्यान, पुणे पोलीस आता या जुन्या पत्राचा आणि सुसाईड नोटचा आधार घेऊन तपासाची चक्रे फिरवत आहेत. निवडणुकांच्या धामधुमीत एका उमेदवाराचे नाव अशा प्रकारे गुन्हेगारी टोळीशी जोडले गेल्यामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सादिक कपूर हा हडपसर परिसरातील कुख्यात गुंड टिपू पठाण याच्यासोबतच्या 'मोक्का' गुन्ह्यात पाहिजे होता.
