25 लाख रुपये द्यावे लागतील नाहीतर...
हडपसरमधील सय्यदनगर आणि काळेपडळ परिसरात स्वतःची भाईगिरी गाजवणाऱ्या रिझवान ऊर्फ टिपू पठाण आणि त्याच्या साथीदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या टोळीने सय्यदनगरमधील एका जागेवर बेकायदेशीरपणे कब्जा केला होता आणि तिथे पत्र्याचे शेड उभारले होते. जेव्हा तक्रारदार महिलेने आपली जागा रिकामी करण्यास सांगितले, तेव्हा या गुंडांनी तिला धमकावण्यास सुरुवात केली. जागा सोडायची असेल तर 25 लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी त्यांनी केली. पैसे दिले नाहीत तर जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांनी महिलेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.
advertisement
25 गंभीर गुन्हे दाखल
टिपू पठाण हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्या गुन्हेगारी कारवायांची यादी मोठी आहे. त्याच्या नावावर आतापर्यंत खून, खुनाचा प्रयत्न, दहशत माजवणे आणि खंडणी उकळणे यांसारखे तब्बल 25 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याची ही वाढती गुंडागर्दी लक्षात घेऊन काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी त्याच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यांनी या संदर्भातील प्रस्ताव पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्याकडे पाठविला होता.
'MCOCA' कारवाई करण्याचे आदेश
अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी या प्रस्तावाची सखोल पडताळणी केली. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या कुख्यात टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत म्हणजेच 'MCOCA' कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. टिपू पठाण आणि त्याच्या टोळीवर मोक्का लावल्यामुळे परिसरातील इतर गुन्हेगारांचेही धाबे दणाणले आहेत.
