नेमकी घटना काय?
पीडित मुलगी अवघ्या १३ वर्षांची असताना नोव्हेंबर २०१८ मध्ये ही घटना घडली. तिची आई भोर तालुक्यातील एका फार्महाऊसवर स्वयंपाकाचे काम करत असे. दिवाळीच्या दरम्यान, आईला घरी बोलवण्यासाठी गेलेल्या या चिमुकलीला आरोपी बजरंगने गाठले. त्याने जबरदस्तीने तिला एका खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केले आणि कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
advertisement
शाळेत चक्कर आली अन् सत्य समोर
चार महिन्यांनंतर, मार्च २०१९ मध्ये पीडित मुलगी शाळेत असताना तिला अचानक चक्कर आली. आईने तिला तातडीने डॉक्टरांकडे नेले असता, ती ४ महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. या धक्क्याने आईच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलीला विश्वासात घेतल्यावर तिने नराधम बजरंगचे नाव सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
DNA चाचणीने आरोपीला कसं अडकवलं?
या खटल्यात पीडितेचा गर्भपात करण्यात आला होता. पोलिसांनी अर्भकाचे नमुने डीएनए चाचणीसाठी पाठवले होते. डीएनए अहवालात आरोपी बजरंग हाच त्या अर्भकाचा जैविक पिता असल्याचे सिद्ध झाले. हा तांत्रिक पुरावा आणि सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी तपासलेले १२ साक्षीदार यांच्या जोरावर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.
विशेष न्यायाधीश सुचेता टाकळीकर यांनी हा निकाल देताना समाजाला कडक संदेश दिला आहे. आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी आणि दंड ठोठावण्यात आला असून, दंडातील रक्कम पीडितेला भरपाई म्हणून दिली जाणार आहे.
