ही घटना 24 एप्रिल 2016 रोजी शिवाजीनगर पोलिस मुख्यालयातील मैदानावर लेखी परीक्षेदरम्यान घडली. त्या वर्षी पुणे शहर पोलिस दलातर्फे भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. गजानन शिवलाल गुसिंगे या उमेदवाराने मैदानी परीक्षा पूर्ण केली होती. परंतु लेखी परीक्षेसाठी त्याने स्वतःऐवजी भाऊ सुप्पडसिंगला बसविले. या फसवणुकीसाठी बनावट ओळखपत्रे तयार करण्यात आली होती. लेखी परीक्षेचे चित्रीकरण तपासात महत्त्वाचा पुरावा ठरले. एका साक्षीदाराच्या जबाबातून परीक्षेत दिसणारा उमेदवार गजानन नसून त्याचा भाऊ सुप्पडसिंग असल्याचे स्पष्ट झाले.
advertisement
दरम्यानच्या काळात सुप्पडसिंग स्वतःच 2023 मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदावर नियुक्त झाला होता. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात तो कार्यरत असल्याचे माहिती मिळताच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने राज्य राखीव दल गट क्रमांक सात येथून त्याला अटक केली. या प्रकरणी दोन्ही भावांविरोधात फसवणूक, तोतयेगिरी, बनावट कागदपत्रे तयार करणे, कट रचणे यांसह परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजाननचा शोध अद्याप सुरु असून, बनावट ओळखपत्रे कुठून तयार झाली, कोणाची मदत घेतली याचा तपास सुरू आहे.
आरोपीकडून या गैरप्रकाराची पूर्ण चौकशी करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली होती. सरकारी वकील श्रीधर जावळे आणि तपास अधिकारी दादासाहेब पाटील यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. बचाव पक्षातर्फे ॲड. चेतन भुतडा यांनी मांडणी केली. सुनावणीनंतर न्यायालयाने सुप्पडसिंगला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सार्वजनिक सुरक्षेविषयक जबाबदारीची शपथ घेतलेल्या अधिकाऱ्यानेच नियम मोडून भावासाठी अशा प्रकारे फसवणूक केल्याने पोलिस दलाच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता पुढील तपासातून या मुन्नाभाई स्टाईल डमी प्रकरणातील आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
