शस्त्राने तरुणावर सपासप वार
पुण्यातील घोरपडी परिसरात रामनवमीच्या मिरवणुकीत झालेल्या बॅनर लावण्याच्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले आणि आरोपींनी धारदार शस्त्राने तरुणावर सपासप वार केले. या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून मिरवणुकीच्या आनंदाला गालबोट लागलं आहे.
advertisement
नेमकं काय घडलं?
घटनेची सुरुवात 26 मार्च रोजी रामनवमीच्या मिरवणुकीत बॅनर लावण्यावरून झाली. रात्री 8:30 च्या सुमारास बी. टी. कवडे रोड परिसरात पहिली झटापट झाली होती. मात्र, हा वाद तिथेच संपला नाही. आरोपींनी मनात राग धरून रात्री 11 च्या सुमारास मुंढवा परिसरातील जाधव वस्ती येथे अजिंक्य गवळी, अक्षय गवळी आणि त्यांच्या मित्रांना गाठलं आणि पुन्हा हल्ला चढवला. या भीषण हल्ल्यात अक्षय गवळी हा गंभीर जखमी झाला आहे.
अक्षयची प्रकृती अत्यंत चिंताजनक
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय यांच्या शरीरावर 70 पेक्षा जास्त टाके पडले असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्यांच्यावर सध्या पुण्यातील केईएम (KEM) हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. फिर्यादी अजिंक्य गवळी यांच्या तक्रारीवरून काशीराम मोघे, अभिषेक मोघे, नंदू थोरात आणि इतर 3 अज्ञात व्यक्तींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मुंढवा परिसरात भीतीचं वातावरण
दरम्यान, समोर आलेल्या सीसीटीव्ही व्हिडीओमधून स्पष्ट दिसतंय की, अनेक तरुण पोरं रस्त्यावर आली अन् त्यांनी या किरकोळ भांडणाचं रुपांतर मोठ्या भांडणात केलं. त्यामुळे मुंढवा परिसरात भीतीचं वातावरण होतं. अशातच पोलीस प्रशासन हातावर हात ठेऊन बसल्याचं चित्र पहायला मिळत आहे.
