दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल दोषी
गर्भवती तनिषा भिसे यांचा वेळेवर उपचार आणि रुग्णवाहिका न मिळाल्याने मृत्यू झाला होता. या गंभीर प्रकरणाची धर्मादाय आयुक्तालयाने स्वतःहून (स्युमोटो) दखल घेत चौकशी केली होती. या चौकशी अहवालात लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन संचलित दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला दोषी ठरवण्यात आलं आहे. उपचारांसाठी 10 लाख रुपयांची अनामत रक्कम मागितल्याने उपचारांना विलंब झाला आणि त्यातच तनिषा यांचा जीव गेल्याचे समोर आलं आहे.
advertisement
11 जणांवर फौजदारी खटला दाखल
प्रख्यात गायक हृदयनाथ मंगेशकर आणि गायिका उषा मंगेशकर यांच्यासह 11 जणांवर फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे धर्मादाय आयुक्तालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या नावांच्या विरोधात आणि नामांकित रुग्णालयावर अशी फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. संयुक्त धर्मादाय आयुक्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राजेश परदेशी, दीपक खराडे, सचिन बकाळ आणि रवींद्र गावरे यांच्या समितीने हा तपास पूर्ण केला.
मंगेशकर कुटूंबियांच्या अडचणी वाढल्या
पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक सचिन बकाळ यांनी रुग्णालय आणि 11 विश्वस्तांविरोधात फौजदारी खटला दाखल केलाय. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात दाखल केलेल्या खटल्यात पं. हृदयनाथ मंगेशकर, भारती मंगेशकर, उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, डॉ. धनंजय केळकर, डॉ. जितेंद्र क्षीरसागर, अॅड. पी. एम. खिरे, सचिन व्यवहारे, आर. पी. जोशी आणि डॉ. प्रसाद राजहंस यांचा समावेश आहे.
डॉक्टरांनी थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र...
दरम्यान, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने यासंबंधी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अहवालाशी संबंधित रुग्णाला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवलं होतं, पण कोणतीही पूर्वसूचना न देता रुग्ण रुग्णालयातून बाहेर पडला. त्यामुळे आम्हाला त्यांना थांबवता आलं नाही. डॉक्टरांनी थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र ते थांबले नाहीत, असं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
