मरकळ (ता. खेड) येथील रहिवासी असलेल्या पती आदित्य अनिल लोखंडे (२८), सासरे अनिल किसन लोखंडे (५३), सासू सुवर्णा अनिल लोखंडे (४८) आणि नणंद समृद्धी अनिल लोखंडे (२५) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ वर्षीय पीडित विवाहितेने यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहिता आणि आदित्य लोखंडे यांचा विवाह २२ ऑगस्ट २०२३ रोजी मोठ्या थाटामाटात झाला होता. विवाहितेच्या वडिलांनी लग्नात दोन कोटी रुपये खर्च करून ५५ तोळे सोने, दोन किलो चांदीची भांडी, इलेक्ट्रिक वस्तू आणि एक फॉर्च्युनर गाडी असा मोठा मानपान दिला होता. मात्र, लग्नानंतर अवघ्या दुसऱ्याच महिन्यात हा छळ सुरू झाला. पती आदित्यचा वाढदिवस असल्याने सासरच्या मंडळींनी विवाहितेला वडिलांकडून सोन्याचे कडे आणण्याची मागणी केली. वडिलांनी ४ तोळे वजनाचे सोन्याचे कडे, २५ हजार रुपयाचे घड्याळ आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी ३५ हजार रुपये दिले, तरीही सासरच्या मंडळींची भूक मिटली नाही.
या वाढत्या मागण्यांमुळे वारंवार पती आणि सासरच्या मंडळींकडून माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू झाला. एवढेच नाही, तर सासऱ्याने तिचा विनयभंग केल्याचाही गंभीर आरोप विवाहितेने केला आहे. सासरच्या सततच्या त्रासाला कंटाळून आणि छळाला कंटाळून विवाहितेने माहेरी आश्रय घेतला आणि अखेर विमानतळ पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या चौघांविरोधात तक्रार दाखल केली. विमानतळ पोलीस या प्रकरणात पुढील तपास करत आहेत.
