वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा...
रिंग रोड प्रकल्पाच्या पूर्व भागातील एकूण 12 पॅकेजेसपैकी 9 पॅकेजेसवर सध्या प्रत्यक्ष काम सुरू असून उर्वरित 3 पॅकेजेस प्रशासकीय मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत. संबंधित तीन पॅकेजेसची निविदा प्रक्रिया येत्या मेपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे. हडपसर ते यवत या दरम्यान उन्नत मार्ग उभारला जाणार आहे. या प्रकल्पामुळे काही विद्यमान संरचनांवर परिणाम होऊ शकतो. विशेषत: गाडीतळ परिसरातील तसेच नोबेल हॉस्पिटल परिसरातील महापालिकेने उभारलेल्या काही उड्डाणपुलांबाबत फेरआढावा घेतला जात असल्याची माहिती आहे.
advertisement
FASTag बाबत मोठा निर्णय, डिजिटल पेंमेंटच्या नियमांत बदल, नवे नियम कधीपासून लागू?
उन्नत मार्गाची महामेट्रोकडे जबाबदारी..
हडपसर–लोणी काळभोर मेट्रो मार्गासह हडपसर ते यवतदरम्यान उभारण्यात येणाऱ्या उन्नत मार्गाचे काम महामेट्रोकडे सोपविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या उन्नत मार्गावरूनच मेट्रो धावणार असल्याने दुहेरी उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकल्प एकाच यंत्रणेमार्फत राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामादरम्यान गाडीतळ परिसर तसेच नोबेल हॉस्पिटलजवळील काही विद्यमान उड्डाणपुलांमध्ये बदल किंवा त्यांचे पुनर्बांधकाम करावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पूल पाडणार
हडपसर ते यवत हा उन्नत मार्ग भैरोबा नाल्यापासून सुरू होणार असल्याची माहिती आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये गाडीतळ तसेच नोबेल हॉस्पिटलजवळील सध्याच्या उड्डाणपुलांचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. हे उड्डाणपूल पाडावे लागतील अशी चर्चा देखील तेव्हा झाली होती. तसेच त्याबाबत व्यवहार्यता तपासण्याचे आदेश देखील देण्यात आले होते.






