नेमकी घटना काय?
आकाश कृष्णा चाबुकस्वार (वय २१, रा. फुरसुंगी) असे मृत तरुणाचे नाव आहे. गुरुवारी (१ जानेवारी) सायंकाळी आकाश फुरसुंगी परिसरातून पायी जात होता. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्याला वाटेतच थांबवले. सुरुवातीला त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात असलेल्या हल्लेखोरांनी आकाशच्या डोक्यात मोठा दगड घातला आणि तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर आरोपी तिथून भरधाव वेगात पळून गेले.
advertisement
रस्त्यावरील नागरिकांनी जखमी आकाशला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात हा खून जुन्या वैमनस्यातून किंवा पूर्ववैमनस्यातून झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हडपसर पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासले जात आहे. हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. भरवस्तीत आणि वर्दळीच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे फुरसुंगी परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.
