विदेशी सायकलपटूंचा मराठमोळा ठेका: स्पर्धेचा चौथा आणि शेवटचा दिवस अत्यंत चुरशीचा आहे. मात्र, प्रवासादरम्यान जेव्हा 'नटीनं मारली मिठी' हे गाणे वाजलं, तेव्हा खेळाडूंनी थकवा विसरून ठेका धरला. युरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातून आलेल्या या व्यावसायिक सायकलपटूंना मराठी शब्दांचा अर्थ माहीत नसला, तरी या गाण्यातील ऊर्जेने त्यांना नाचायला भाग पाडलं. या नृत्यामुळे स्पर्धेतील ताणतणाव विरून जाऊन एक आनंदी वातावरण निर्माण झालं.
advertisement
जगभरातील सायकलपटूंचा सहभाग: पुणे ग्रँड टूर ही स्पर्धा केवळ खेळापुरती मर्यादित नसून ती महाराष्ट्राची ओळख जगाला करून देणारं एक माध्यम बनली आहे. यंदा या स्पर्धेत १५० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी भाग घेतला होता. चार दिवसांच्या या खडतर प्रवासात खेळाडूंनी सह्याद्रीचे डोंगरदरे, वेगाने धावणारे महामार्ग आणि पुण्याच्या ऐतिहासिक रस्त्यांचा अनुभव घेतला.
क्रीडा आणि संस्कृतीचा मेळ: पुणे ग्रँड टूरच्या माध्यमातून विदेशी खेळाडूंना स्थानिक संस्कृती, खाद्यपदार्थ आणि लोकसंगीताची जवळून ओळख करून दिली जाते. खेळाडूंच्या डान्सचा हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला असून, मराठी गाण्यांची मोहिनी सातासमुद्रापार कशी पोहोचली आहे, याचीच ही प्रचिती आहे. या अनोख्या प्रसंगामुळे यंदाची पुणे ग्रँड टूर सायकलपटूंच्या आणि पुणेकरांच्या कायम स्मरणात राहणार आहे.
