'शेतमाल निर्यातीच्या व्यवसायात गुंतवणूक अन् 20 महिन्यात पैसे डबल'; पुण्यात 15 कोटीच्या फसवणुकीचं धक्कादायक प्रकरण
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
शेतमाल निर्यातीच्या व्यवसायात गुंतवणुकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून पुणे, बीड आणि सोलापूरसह राज्यभरातील शेकडो गुंतवणूकदारांना १५ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पुणे : शेतमाल निर्यातीच्या व्यवसायात गुंतवणुकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून पुणे, बीड आणि सोलापूरसह राज्यभरातील शेकडो गुंतवणूकदारांना १५ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी हडपसर येथील प्रशांत अनिल गवळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे.
अशी केली फसवणूक: संशयित आरोपी प्रशांत गवळी याने हडपसरमधील मगरपट्टा रस्ता परिसरात 'समर्थ क्रॉप केअर' नावाची कंपनी स्थापन केली होती. त्याने स्वतःला 'मानद व्यापार आयुक्त' असे बनावट पद लावून लोकांचा विश्वास संपादन केला. "शेतमाल निर्यातीतून मोठा नफा मिळतो, तुम्ही गुंतवणूक केल्यास दरमहा १० टक्के परतावा किंवा २० महिन्यांत मुद्दल दुप्पट करून मिळेल," असे आमिष त्याने दाखवले.
advertisement
सुरुवातीच्या काळात काही गुंतवणूकदारांना थोडा परतावा देऊन त्यांचा विश्वास जिंकला. ज्यामुळे पुणे, धाराशिव, अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी मोठी रक्कम गुंतवली. मात्र, त्यानंतर परतावा देणे बंद करून त्याने गुंतवणूकदारांची फसवणूक केली.
या प्रकरणी सोमवार पेठेतील एका ६१ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आतापर्यंत ३० हून अधिक गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेऊन आपले जबाब नोंदवले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणुकीचा हा आकडा १५ कोटींहून अधिक जाण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अशा भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 10:25 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
'शेतमाल निर्यातीच्या व्यवसायात गुंतवणूक अन् 20 महिन्यात पैसे डबल'; पुण्यात 15 कोटीच्या फसवणुकीचं धक्कादायक प्रकरण







