प्रकाश दाबले भूल (वय ११, रा. गंधर्व गीत सोसायटी, ससाणेनगर, हडपसर) असे मृत मुलाचे नाव आहे. गुरुवारी (११ डिसेंबर) रेल्वे रुळावर त्याचा मृतदेह आढळल्याची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने काळेपडळ पोलिसांना दिली. माहिती मिळताच सहायक निरीक्षक निंबाळकर आणि पोलीस अंमलदार भंडारी यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह ससून रुग्णालयात हलवला. त्यानंतर मृतदेह कमांड हॉस्पिटल येथे आणण्यात आला.
advertisement
मृत प्रकाशच्या पोटावर कापल्याचे स्पष्ट व्रण असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिक नागरिकांनी त्याची किडनी काढल्याचा गंभीर संशय व्यक्त केला आहे, ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती देताना काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांनी सांगितलं की, "संबंधित मुलावर त्याचे वडील पतंग उडवल्याच्या कारणावरून ओरडले होते. त्यामुळे तो रागाच्या भरात रेल्वे रुळाच्या दिशेने गेला होता, याची माहिती त्याच्या वडिलांना होती." सुरुवातीला या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. मात्र, आता मृतदेहावर आढळलेल्या संशयास्पद जखमांमुळे पोलीस मृतदेहाचा सखोल वैद्यकीय अहवाल आणि मृत्यूचे नेमके कारण काय आहे, याचा कसून तपास करत आहेत. मानवी अवयवांच्या तस्करीच्या दृष्टीनेही पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
