नेमका घटनाक्रम काय?
बीबीए (BBA) शिक्षण पूर्ण झालेला वैभव पुनावळे येथील 'पेटकर सियोना' सोसायटीत आपल्या मित्राच्या फ्लॅटवर गेला होता. मध्यरात्री अडीचच्या सुमारास मित्रांसोबत जेवण झाल्यानंतर तो फ्लॅटच्या बाहेर आला. कुणाला काही कळण्याच्या आत त्याने पॅसेजच्या उंच भिंतीवरून थेट खाली उडी मारली. २४ व्या मजल्यावरून कोसळल्याने त्याचा जागीच करुण अंत झाला.
advertisement
कुटुंबीयांशी नोकरीबाबत लपवाछपवी
तपासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. वैभव आपल्या आई-वडिलांना तो आयटी कंपनीत नोकरी करत असल्याचे सांगत होता. मात्र, वास्तवात तो त्याच्या मित्राच्या पोल्ट्री व्यवसायात मदत करत होता. उच्चशिक्षण घेऊनही अपेक्षित नोकरी न मिळाल्याने किंवा 'आयटी'मधील करिअरबाबत असलेल्या सामाजिक दबावामुळे त्याने हे खोटे सांगितले होते का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
घटनेची माहिती मिळताच रावेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वैभवने आपल्या कुटुंबीयांना नोकरीबाबत खोटी माहिती का दिली? तो नेमक्या कोणत्या मानसिक तणावातून जात होता? की आयटी क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या ओझ्याखाली तो दबला गेला होता? या दिशेने वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. रावेत पोलीस ठाण्यात सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
