नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, कपिल किशोर वारे (वय २४, रा. लाखणगाव, ता. आंबेगाव) हे शुक्रवारी रात्री ११:३० च्या सुमारास अष्टविनायक महामार्गावरून आपल्या दुचाकीने घरी निघाले होते. यावेळी कवठे येमाई हद्दीत ऊस वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक पंक्चर झाल्याने चालकाने ट्रॅक्टर रस्त्यावरच उभा केला होता. रात्रीचा अंधार असल्याने उभ्या असलेल्या ट्रॅक्टरचा अंदाज कपिल यांना आला नाही आणि त्यांची दुचाकी थेट ट्रॉलीच्या मागील भागावर जाऊन आदळली.
advertisement
ही धडक इतकी भीषण होती की, कपिल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या दुचाकीचाही चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असल्याने अष्टविनायक महामार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलींची मोठी वर्दळ असते. अनेकदा हे ट्रॅक्टर रस्त्याच्या मध्यभागी किंवा कडेला उभे केले जातात. अशा उभ्या वाहनांना रिफ्लेक्टर किंवा रेडियम नसल्यामुळे रात्रीच्या वेळी मागून येणाऱ्या वाहनचालकांना धोका निर्माण होतो. कपिल वारे यांच्या मृत्यूमुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेचा आणि नियमांच्या अंमलबजावणीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
