मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास जेव्हा दुकानाचे मालक श्री. बाबर, त्यांचा आजारी मुलगा आणि दोन महिला कर्मचारी दुकानात उपस्थित होते. तेव्हा दोन दुचाकींवरून पाच जण तिथे पोहोचले. या सर्वांनी तोंडाला रुमाल बांधलेले होते. दुकानात शिरताच दरोडेखोरांनी धारदार कोयते उपसले आणि उपस्थित सर्वांना ठार मारण्याची धमकी दिली. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने रेकी करून आलेल्या या टोळीने काचेच्या कपाटातील सुमारे ७५ ते ८० तोळे सोन्याचे दागिने अवघ्या दीड ते दोन मिनिटांत पिशव्यांमध्ये भरले आणि पानशेतच्या दिशेने वेगाने पसार झाले.
advertisement
घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये पाच चोर दुकानात शिरताना दिसतात. अतिशय वेगात त्यातील काहीजण दुकानातील सोन्याचे दागिने पिशवीत भरायला सुरूवात करतात. तर एकजण मालक आणि दुकानातील कामगारांना हातातील हत्यार दाखवून धमकावताना दिसतो.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. दरोडेखोरांनी पळून जाण्यासाठी वापरलेल्या मार्गाचा तपास सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार, दरोडेखोरांनी या परिसराची गेल्या काही दिवसांपासून बारकाईने पाहणी केली असावी, कारण त्यांना दुकानातील गर्दीची वेळ आणि पळून जाण्याचा रस्ता नेमका माहिती होता. भरवस्तीत आणि वर्दळीच्या रस्त्यावर घडलेल्या या धाडसी दरोड्यामुळे स्थानिक रहिवासी आणि व्यावसायिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
