पिसोळी येथील एआरबी टाऊन सोसायटीत राहणारा २४ वर्षीय तरुण रात्रीच्या सुमारास कोंढव्यातील कौसरबाग परिसरातून पायी जात होता. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्याला अडवले. चोरट्यांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्याला जागीच ठार मारण्याची धमकी दिली.
चोरट्यांनी सुरुवातीला तरुणाकडील मोबाईल आणि हातातील चांदीचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर त्याला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडून स्वतःच्या खात्यात १० हजार रुपये जमा करून घेतले. या अनपेक्षित हल्ल्यामुळे तरुण प्रचंड घाबरला होता. घटनेनंतर काही दिवसांनी त्याने सावरून कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.
advertisement
कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कौसरबाग परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. ज्या बँक खात्यात पैसे जमा झाले, त्या आधारे चोरट्यांचा माग काढला जात आहे. रात्रीच्या वेळी एकट्या पादचाऱ्यांना लक्ष्य करणाऱ्या या टोळीमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
पोलीसच निघाला 'ड्रग्ज तस्कर'
दुसऱ्या एका घटनेत नुकतंच पुणे ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थांच्या विरोधात केलेल्या एका मोठ्या कारवाईत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तब्बल २० कोटी रुपयांचे 'एमडी' (मेफेड्रॉन) ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या रॅकेटचा मुख्य सूत्रधार चक्क पोलीस दलातील हवालदारच निघाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
