प्रवाशांचा वाचणार वेळ, वाढणार लोकलची संख्या
सध्या या मार्गावर केवळ दोनच मार्गिका असल्याने ४१ लोकल गाड्यांची कोंडी होते. विशेषतः मालगाड्यांच्या वाहतुकीमुळे लोकलला होणारा विलंब प्रवाशांच्या डोकेदुखीचा विषय ठरत आहे. नवीन मार्गिकांमुळे या अडचणी दूर होऊन लोकलची वारंवारिता वाढेल, तसेच प्रवासी वेळ २० ते ३० मिनिटांनी कमी होणार आहे. दापोडी ते लोणावळा दरम्यानच्या औद्योगिक आणि निवासी क्षेत्रातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असून, यामुळे रस्ते महामार्गावरील गर्दीही कमी होण्यास मदत होईल.
advertisement
पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवासी संघाचे माजी अध्यक्ष इकबाल मुलाणी यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, सध्याच्या दोन मार्गिकांवर देखभाल-दुरुस्तीसाठी वेळ मिळत नसल्याने नवीन मार्गिका अत्यंत आवश्यक असल्याचे म्हटले आहे. मात्र, अर्थसंकल्पात निधीची घोषणा झाली असली तरी, भूसंपादन आणि प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार, याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी अधिकृत माहिती देण्यास नकार दिल्याने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या तरतुदीमुळे आता ४७ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या कामाला गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
