पुणे : महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिका निवडणुकींसाठी अर्ज मागे घ्यायची मुदत संपली आहे, त्यामुळे महापालिका निवडणुकांचं चित्र स्पष्ट झालं आहे. सर्व उमेदवारांनी अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्रही सोबत जोडलं, ज्यात त्यांच्या एकूण संपत्तीचाही उल्लेख आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये सगळ्यात श्रीमंत उमेदवार हे भाजपच्या तिकीटावर लढत आहे. या उमेदवाराची संपत्ती ही तब्बल 271.85 कोटी रुपये आहे.
advertisement
वडगाव शेरी येथील भाजप उमेदवार सुरेंद्र पठारे हे पुण्याच्या निवडणुकीमध्ये उतरलेले सगळ्यात श्रीमंत उमेदवार आहेत. सुरेंद्र पठारे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची मालमत्ता 271.85 कोटी रुपये एवढी आहे. सुरेंद्र पठारे यांच्याकडे मर्सिडिज बेन्झ, बीएमडब्ल्यू आणि इनोव्हा क्रिस्टा अशा आलिशान गाड्या आहेत. तसंच त्यांची रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक असून सुमारे 1.75 किलो सोन्याचे दागिने आहेत.
सुरेंद्र पठारे यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर खडकवासल्याचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची मुलगी सायली वांजळे आहेत. सायली वांजळे यांच्या नावावर 77.65 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
वडील शरद पवारांचे आमदार, घरात तिघांना भाजपचं तिकीट
सुरेंद्र पठारे यांचे वडील बापू पठारे हे वडगाव शेरीमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे असूनही बापू पठारे यांच्या घरात भाजपकडून तिघांना उमेदवारी मिळाली आहे. बापू पठारे यांचा मुलगा सुरेंद्र पठारे, सून ऐश्वर्या पठारे आणि बापू पठारेंच्या भाचीला भाजपकडून तिकीट मिळालं आहे. ज्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने बापूसाहेब पठारे यांना आमदार केले, त्या पक्षाची 'तुतारी वाजवणारा माणूस' ही निशाणी पठारेंच्या प्रभागातून गायब झाली आहे.
