23.3 किलोमीटर लांबीच्या या उन्नत मेट्रो मार्गावर एकूण 23 स्थानके प्रस्तावित आहेत. त्यापैकी तब्बल 11 स्थानकांचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या स्थानकांवर सरकते जिने, प्रतीक्षालये, पार्किंग सुविधा यांसारखी मूलभूत कामे अपूर्ण आहेत. मात्र, मुख्य मार्गिकेवरील पूल, रुळांचे काम पूर्ण झाले असून दोन मेट्रो ट्रेनसेट दाखल झाले आहेत. विविध वेगांवर चाचण्या देखील यशस्वीपणे पार पडल्या आहेत.
advertisement
सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 8312 कोटी रुपये आहे. 25 नोव्हेंबर 2021 रोजी या प्रकल्पाचे काम सुरू झाले होते. मूळतः मार्च 2025 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, भूसंपादनातील अडचणी, विविध परवानग्या मिळण्यास झालेला विलंब आणि जागेचा ताबा वेळेत न मिळाल्यामुळे प्रकल्प रखडला.
हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन जुलै महिन्यात मुख्यमंत्री कार्यालयात सर्व संबंधित विभागांची बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी ‘सिंगल पॉइंट अथॉरिटी’ स्थापन करून विभागीय आयुक्तांकडे जबाबदारी सोपवण्यात आली आणि डिसेंबर 2025 पर्यंत मेट्रो सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात काम पूर्ण न झाल्याने अखेर प्रकल्पाला 543 दिवसांची मुदतवाढ देत 31 मार्च 2026 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.
दरम्यान, मेट्रो सुरू झाल्यानंतर उर्वरित स्थानकांचे काम पूर्ण करता येईल, अशी भूमिका प्रशासनाची आहे. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी मेट्रो लाईन 3 च्या कामाचा आढावा घेतला असून, उर्वरित काम ठरलेल्या मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ‘टाईम लाईन’ काटेकोरपणे पाळण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
हिंजवडीतील आयटी कर्मचारी आणि पुणेकरांसाठी या मेट्रो सेवेची मोठी अपेक्षा आहे. मात्र, अपूर्ण स्थानके आणि सतत वाढणाऱ्या मुदतीमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. आता अपूर्ण स्थानकांना वगळून का होईना, मेट्रो कधी प्रत्यक्षात धावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
