नगर रस्ता, विमाननगर, खराडी आणि वाघोली परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने रामवाडी मेट्रोचा वापर करतात. यापूर्वी मेट्रो स्थानकातून बाहेर पडताच बस मिळत असे. आता थांबा पुढे हलवल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विमानतळावरून सामानासह येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे, ज्या ठिकाणी बसमुळे 'कोंडी' होते असे सांगितले जाते, त्याच ठिकाणी रिक्षा आणि खासगी कॅबच्या रांगा लागलेल्या असतात. मग कोंडी केवळ बसमुळेच होते का? असा संतप्त सवाल पुणेकर विचारत आहेत.
advertisement
शिवाजीनगरमध्येही 'पायपीट'
केवळ रामवाडीच नव्हे, तर पोलिसांच्या सूचनेनुसार पीएमपीने अनेक ठिकाणचे थांबे हलवले आहेत. सीओईपी (COEP) होस्टेल येथील दोन थांबे पुढे हलवण्यात आले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र (शिवाजीनगर) येथील महत्त्वाचा थांबा हलवण्याचे पत्रही पोलिसांनी दिले आहे. जर हा थांबा हलवला, तर प्रवाशांना लांबपर्यंत चालत जावे लागेल, ज्यामुळे ते नाईलाजाने खासगी वाहनांचा किंवा रिक्षाचा पर्याय निवडतील.
शिवाजीनगरमध्ये 'बँक ऑफ महाराष्ट्र' समोर सायंकाळी खासगी ट्रॅव्हल्सची मोठी गर्दी असते, ज्यामुळे खरी वाहतूक कोंडी होते. मात्र, त्यावर कारवाई करण्याऐवजी सर्वसामान्यांच्या बसचे थांबे हलवण्यावर भर दिला जात आहे. रामवाडी स्थानकाबाहेर रिक्षाचालक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत.सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्याऐवजी फीडर सेवेचा कणा असलेल्या बस थांब्यांवरच गदा येत असल्याने पुणेकरांमध्ये तीव्र नाराजी आहे.
