प्रकरण काय?
पिंपरी ते निगडी या ४.५१ किलोमीटरच्या मेट्रो मार्गाचे ५४ टक्के काम पूर्ण झाले आहे. टिळक चौकात मेट्रोच्या खांबांचे काम सुरू असल्याने रस्ता अरुंद झाला असून भीषण वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीता गायकवाड यांनी हे बसस्थानक तात्पुरते हटवण्याचे पत्र पीएमपी प्रशासनाला दिले आहे. बसगाड्या भक्ती-शक्ती ते आकुर्डी खंडोबा माळ मार्गावरून वळवण्याचा वाहतूक पोलिसांचा घाट आहे.
advertisement
प्रवाशांची होणार मोठी पायपीट
हे स्थानक १९८२ पासून सुरू असून येथून लोणावळा, हिंजवडी, मावळ आणि पिंपळे गुरव अशा विविध भागांत जाणाऱ्या २४ हून अधिक बस सुटतात. जर हा थांबा हटवला, तर प्रवाशांना भक्ती-शक्ती किंवा खंडोबा माळ चौकापर्यंत ३ किलोमीटरची पायपीट करावी लागेल. यामुळे २० हजार विद्यार्थी, ५० हजार ज्येष्ठ नागरिक आणि ६० हजार महिलांची मोठी गैरसोय होईल. तसंच प्रवासाचा वेळ वाढण्यासोबतच तिकीट दरातही १० ते २० रुपयांची वाढ सोसावी लागेल.
पीएमपी प्रशासनाचा ठाम नकार
वाहतूक पोलिसांच्या या मागणीला पीएमपी प्रशासनाने स्पष्ट विरोध दर्शवला आहे. "मुख्य रस्त्यावर दर एक किलोमीटरला बसथांबा असणे गरजेचे आहे. भक्ती-शक्ती आणि आकुर्डी चौक यातील अंतर जास्त असल्याने हे स्थानक हटवणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही," असे पीएमपीचे जनसंपर्क अधिकारी किरण चौहान यांनी स्पष्ट केले आहे. आता मेट्रोच्या कामासाठी प्रवाशांना वेठीस धरले जाणार की प्रशासन सुवर्णमध्य काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
