खरं तर पुणे महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादीत युती होईल असे सगळ्यांनाच वाटत होते. पण आज अचानक ही युती होण्याआधीच फिस्कटल्याची माहिती समोर आली आहे. चिन्हावरून ही युती फिस्कटल्याची माहिती आहे.त्याच झालं असं की राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पदाधिकारी आज अजित पवार यांना भेटायला गेले होते. पण अजित पवार यांनी पुणे महापालिका निवडणुका राष्ट्रवादीच्या पारंपारिक घड्याळाच्या चिन्हावर लढवाव्यात असा आग्रह धरला होता. विशेष म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीत जागावाटपावरून एकमत झालं होतं. पण चिन्ह जे आहे ते घड्याळच राहिल,अशी अजित पवार यांची भूमिका होती. आणि यावर अजित पवार ठाम होते.
advertisement
या चर्चेनंतर सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली.या चर्चेत चिन्ह ही आपल्या पक्षाची ओळख आहे,त्यामुळे काही झाले तरी आपले उमेदवार हे तुतारी चिन्हावरच लढतील. पण जर अजित पवार यांना ही गोष्ट मान्य नसेल तर तातडीने महाविकास आघाडीसोबत युती करण्यासाठी बैठका सूरू करा अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यानुसार शिवसेना आणि काँग्रेसला त्यासंदर्भातले निरोप देण्यात आले होते. त्यानंतर दुपारी जयंत पाटील अडीच तास मातोश्रीवर गेले होते. या बैठकीत पुण्यात एकत्रित लढण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते आहे.
या बैठकीतून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर आज संध्याकाळी रास्ता पेठेतल्या शांताई हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली आहे. या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून विशाल तांबे अंकुश काकडे आणि अन पदाधिकारी उपस्थित होते. तर शिवसेनेकडून वसंत मोरे आणि गजानन थरकुडे तर काँग्रेसकडून अरविंद शिंदे आणि अभय छाजेड उपस्थित होते. या राष्ट्रवादीच्या या बैठकीने अजित पवार यांच्यासोबत युती होण्याच्या चर्चेला ब्रेक बसल्याचे बोलले जात आहे.
तसेच पुण्यात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत युती होणार होती.पण या युतीमध्ये देखील बिघाड झाला आहे. या बिघाडीनंतर अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना एकत्र येण्याच्या सुरू झाल्या आहेत.असे जर झाल्यास भाजप, राष्ट्रवादी-शिंदे आणि महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत पुणे महापालिकेत रंगण्याची शक्यता आहे.
