खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे मंत्रालयाकडून पुणे- नांदेड वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनाची तयारी सुरू करण्यात आली आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यावर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील कनेक्टिव्हिटी आणि प्रवास सुखकर होणार आहे. शिवाय नोकरदारांना आणि अनेक व्यावसायिकांना याचा फार मोठा फायदा होणार आहे. खरंतर, 550 किमीच्या पुणे- नांदेड मार्गावर एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी जवळपास 10 तासांचा अवधी लागायचा. पण, आता वंदे भारत एक्सप्रेसने 7 तासांचा अवधी लागेल. पुणे- भारत वंदे भारत एक्सप्रेसमुळे प्रवाशांचे तीन तास वाचणार आहेत.
advertisement
नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी पुणे- नांदेड मार्गावर वंदे भारत सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने सकारात्मक प्रतिसाद देत गाडीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. अद्याप उद्घाटनाची तारीख समोर आली नसून या एक्सप्रेसचं वेळापत्रकही समोर आलेलं नाही. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पुणे- नांदेड वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नांदेड शहराला पुणे- नांदेड ही दुसरी वंदे भारत एक्सप्रेस मिळाली आहे. यापूर्वी मुंबई-नांदेड ही वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली होती.
पुणे, दौंड, कुर्डूवाडी, धाराशिव, लातूर आणि नांदेड या ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेस थांबण्याची शक्यता आहे. तिकिटांच्या दराबाबत बोलायचे झाले तर एसी चेअर कारसाठी तिकिटांचे दर 1500 ते 1900 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी 2000 ते 2500 रुपये दरम्यान असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ही गाडी आठवड्यातून पाच ते सहा दिवस धावेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
