'ती' नवी ट्रेन कोणत्या शहरांना जोडणार?
नवी वंदे भारत एक्स्प्रेस ही नवी ट्रेन पुणे आणि नांदेड या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणार असून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांमधील प्रवास आणखी जलद आणि सोयीस्कर होणार आहे. रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार ही नवी वंदे भारत एक्स्प्रेस डिसेंबर 2025 अखेर किंवा जानेवारी 2026 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.
advertisement
सध्या पुणे-नांदेड दरम्यान सुमारे 550 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी 10 ते 12 तासांचा वेळ लागतो. मात्र आता वंदे भारत सुरू झाल्यानंतर हा प्रवास केवळ 7 तासांत पूर्ण होणार आहे. प्रवाशांचा वेळ आणि खर्च अशा दोन्ही गोष्टी वाचतील. यामुळे दोन्ही शहरांमधील व्यवसाय, शिक्षण आणि पर्यटन अधिक बळकट होणार आहे.
असे असतील ट्रेनचे थांबे?
या ट्रेनचे थांबे नांदेड, लातूर, धाराशिव, कुर्डुवाडी, दौंड आणि पुणे येथे असतील. त्यामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्रांना थेट रेल्वे जोडणी मिळणार आहे. विशेष म्हणजे या मार्गामुळे मध्य रेल्वे आणि दक्षिण मध्य रेल्वे विभागांची जोडणी अधिक मजबूत होणार आहे.
प्रवाशांसाठी हा प्रवास किती स्वस्त किंवा महाग?
रेल्वे विभागाने प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आणले असून चाचणी धावांचे वेळापत्रक लवकरच जाहीर होईल. प्राथमिक माहितीनुसार, या ट्रेनच्या एसी चेअर कारच्या तिकिटांची किंमत सुमारे 1500 रुपये ते 1900 रुपयांदरम्यान असू शकते. ट्रेन आठवड्यातून पाच ते सहा वेळा धावेल अशी शक्यता आहे. मात्र, अधिकृत तिकीट दर आणि वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. प्रवाशांची मागणी आणि मार्गाची व्यस्तता लक्षात घेऊन अंतिम वेळापत्रक ठरवले जाईल.
सध्या महाराष्ट्रात मुंबई-नांदेड, मुंबई-गोवा, नागपूर-बिलासपूर, सोलापूर-मुंबई अशा 12 वंदे भारत गाड्या धावत आहेत. या ट्रेनमुळे आधीच अनेक जिल्ह्यांना आधुनिक रेल्वे सुविधा मिळाल्या आहेत. आता पुणे-नांदेड वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा संपर्क अधिक वेगवान आणि आधुनिक होणार आहे.
