द्राक्षाच्या बागेत बिबट्याचा थरार: गुरुवारी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास स्थानिक शेतकरी कुलदीप पवार हे आपल्या द्राक्षाच्या बागेत औषध फवारणी करत होते. यावेळी त्यांना अचानक समोर बिबट्या दिसला. सुरुवातीला तो तरस किंवा रानमांजर असावे असे त्यांना वाटले, मात्र हालचालींवरून तो बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले. कुलदीप यांनी घाबरून न जाता अत्यंत धैर्याने त्या बिबट्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.
advertisement
वन विभागाची कारवाई: या घटनेची माहिती मिळताच शिंदेवाडीचे पोलीस पाटील स्वप्नील शिंदे यांनी वन विभागाशी संपर्क साधला. वन विभागाची टीम तातडीने गावात दाखल झाली असून त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. सध्या जमिनीवरील पाऊलखुणांच्या (ठशांच्या) आधारे तपास सुरू आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने त्वरित पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वन विभागाने शिंदेवाडी आणि परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, की रात्रीच्या वेळी शेतात किंवा रस्त्यावर मुळीच एकटे फिरू नका. तसंच अंधारात बाहेर पडताना हातात काठी आणि टॉर्च सोबत ठेवा. यासोबतच लहान मुलांना घराबाहेर एकटं सोडू नका, असं आवाहनही वनविभागाने नागरिकांना केलं आहे.
