मृत्यूपूर्वी हातावर मजकूर लिहिला
हडपसर भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवार फारुख शेख यांच्या त्रासाला कंटाळून सादिक उर्फ बाबू कपूर या तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सादिक यांनी त्यांच्या कार्यालयातच हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सादिक यांनी मरण्यापूर्वी आपल्या हातावर काही मजकूर लिहिला होता, ज्यावरून संशयाची सुई राजकीय दबावाकडे वळत आहे.
advertisement
30 पानांची सुसाईड नोट
सादिक यांनी आत्महत्येपूर्वी एक मोठी सुसाईड नोट लिहून ठेवली असून, यामध्ये त्यांनी आपल्या मनातील वेदना मांडल्या आहेत. सुमारे 30 पानांच्या या सुसाईड नोटमध्ये फारुख शेख यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. सय्यद नगर भागातील एका जमिनीच्या तुकड्यावरून हा वाद गेल्या अनेक दिवसांपासून धुमसत होता. या ५ गुंठे जमिनीच्या वादातून फारुख शेख हे सादिक यांना वारंवार टॉर्चर करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याच मानसिक त्रासातून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.
पुण्याचे राजकीय वातावरण तापलं
या सुसाईड नोटमध्ये केवळ एकाच व्यक्तीचे नाव नसून इतरही अनेक लोकांच्या नावांचा समावेश असल्याचे समजते, ज्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेचा प्रचार सुरू असतानाच घडलेल्या या गुन्हेगारी घटनेमुळे पुण्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, या सुसाईड नोटमधील मजकुराच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
