विमानतळ भागातील एका ॲकॅडमीमध्ये हा पीडित मुलगा पियानो शिकण्यासाठी जात होता. 8 डिसेंबर रोजी सायंकाळच्या वेळी ॲकॅडमीतील एका व्यक्तीने या मुलासोबत अश्लील कृत्य केलं. या घटनेमुळे घाबरलेल्या मुलाने त्वरित घरी जाऊन घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. मुलाची आई हा प्रकार ऐकून हादरली आणि तिने तातडीने विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधितांविरुद्ध फिर्याद दाखल केली.
advertisement
मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगा सध्या एका शाळेत शिक्षण घेत आहे. ही घटना एका प्रतिष्ठित प्रशिक्षण संस्थेत घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अशा प्रकारे लहान मुलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे करत आहेत.
तरुणीने तरुणाला लुटलं
पुण्यातून नुकतंच समोर आलेल्या आणखी एका घटनेत इन्स्टाग्रामवर ओळख करून तरुणीने 28 वर्षांच्या तरुणाला लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. इन्स्टाग्रामवर या दोघांची एकमेकांसोबत ओळख झाली, त्यानंतर तरुणीने मुलाला कात्रजच्या घाटात भेटायला बोलावलं, यानंतर तरुणही तिने बोलावलेल्या ठिकाणी पोहोचला, पण मुलीने तिच्यासोबत काही जणांना बोलावलं होतं. यानंतर तरुणी आणि तिच्या सहकाऱ्यांनी तरुणाला धमकावलं आणि त्याच्याकडून 10 हजार रुपये उकळले. यानंतर तरुण थेट भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला पोहोचला आणि तक्रार दाखल केली, याप्रकरणी पोलिसांनी चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
