संशयास्पद संपत्ती जमा केली?
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी टोळीप्रमुख नीलेश घायवळ याच्या संशयास्पद आर्थिक उलाढालींचा तपास करण्यासाठी अंमलजावणी संचालनालयाला म्हणजेच ईडीला पत्र पाठवून औपचारिक विनंती केली आहे. घायवळविरोधात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, याच गुन्ह्यांतून त्याने मोठी आणि संशयास्पद संपत्ती जमा केली असावी, असा पोलिसांना दाट संशय आहे.
advertisement
आर्थिक उलाढालीचे ठोस पुरावे हाती
पोलिसांच्या नोंदीनुसार, नीलेश घायवळ आणि त्याच्या टोळीवर एकूण 11 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खंडणी, खुनाचा प्रयत्न, गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक करणे, बनावट कागदपत्रे तयार करणे तसेच मालमत्ता बळकावण्यासाठी दुखापत पोहोचवणे अशा अनेक गंभीर आरोपांचा समावेश आहे. तपासादरम्यान पोलिसांना घायवळच्या प्रचंड मोठ्या आर्थिक उलाढालीचे ठोस पुरावे हाती लागले आहेत. या टोळीने धाराशिव, अहिल्यानगर, बीड आणि सातारा यांसारख्या परिसरांमध्ये विंड पॉवर प्रकल्पांशी संबंधित गैरव्यवहार, खंडणी आणि इतर बेकायदेशीर मार्गांनी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमवल्याचा पोलिसांना संशय आहे.
बेकायदेशीर मार्गाने पासपोर्ट
पोलिसांनी या सर्व गुन्ह्यांसंदर्भातील एफआयआर आणि आवश्यक पुरावे ईडीकडे सोपवले आहेत. यामुळे या प्रकरणाच्या तपासातून मोठा मनी लॉड्रिंगचा (money laundering) प्रकार उघडकीस येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या घायवळने बेकायदेशीर मार्गाने पासपोर्ट मिळवल्याचेही समोर आले असून, तो सध्या परदेशात असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.
