नेमकी घटना काय?
कविता अर्जुन चव्हाण (वय ३०) आणि त्यांचा मुलगा आरव अर्जुन चव्हाण (वय ४, रा. शिरोली, चाकण) अशी मृतांची नावे आहेत. चव्हाण कुटुंब मूळचे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटचे रहिवासी असून गेल्या काही वर्षांपासून ते कामानिमित्त खेड तालुक्यातील चाकण (शिरोली) येथे वास्तव्यास होते. चार दिवसांपूर्वी अक्कलकोट येथे एका धार्मिक कार्यासाठी ते गेले होते. तिथून रेल्वेने परत येत असताना ते कासारवाडी स्थानकावर उतरले. रात्रीची वेळ असल्याने आणि प्लॅटफॉर्म बदलण्याच्या घाईत कविता आपल्या मुलाला घेऊन रेल्वे रूळ ओलांडत होत्या. त्याच वेळी वेगाने आलेल्या रेल्वेने त्यांना जोराची धडक दिली.
advertisement
Central Railway: वर्षाअखेर फिरायचा प्लॅन? पुण्यातून थेट प्रयागराजला ट्रेन, पाहा वेळापत्रक
या भीषण अपघातात माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला. डोळ्यांदेखत पत्नी आणि पोटच्या मुलाचा अंत झाल्याने अर्जुन चव्हाण यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अर्जुन हे चाकणमधील एका खासगी कंपनीत कामगार म्हणून कार्यरत आहेत. रात्रीच्या शांततेत घडलेल्या या अपघाताने कासारवाडी स्थानक परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत.
या घटनेमुळे रेल्वे स्थानकांवरील पादचारी पुलाचा (FOB) वापर करण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी किंवा घाईत रूळ ओलांडणे किती जीवघेणे ठरू शकते, याची प्रचिती या घटनेने दिली आहे. "जीवावर बेतणारी घाई टाळा आणि नेहमी पुलाचाच वापर करा," असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे.
