रक्षकच निघाला भक्षक: या ड्रग्स तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी शामसुंदर गुजर हा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेमध्ये (LCB) पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहे. ज्या यंत्रणेवर गुन्हेगारांना जेरबंद करण्याची जबाबदारी असते, त्याच यंत्रणेचा भाग असलेला गुजर स्वतः ड्रग्स तस्कर असल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासातून समोर आले आहे की, गुजर गुन्हेगार आणि तस्करांना अंतर्गत माहिती पुरवून तस्करीचे रॅकेट चालवण्यासाठी संरक्षण आणि सोयी पुरवत होता.
advertisement
शिरूर पोलिसांनी सुरुवातीला शाबाद शेख याला २ कोटी १० लाखांच्या ड्रग्जसह अटक केली होती. त्याच्या चौकशीतून या साखळीचा उलगडा झाला. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत शिरूरजवळील कुरुंद गावातून १० किलो एमडी ड्रग्ज हस्तगत केले. या प्रकरणात गुजर याला माल पुरवणारा माऊली शिंदे (रा. कोहकडी) यालाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
पोलीस हवालदार गुजर हा या रॅकेटचा महत्त्वाचा वितरक होता. शिंदे याच्याकडून मिळालेले ड्रग्ज गुजर आपल्या 'पंटर'च्या माध्यमातून महाविद्यालयीन तरुणांपर्यंत पोहोचवत होता. विशेष म्हणजे, जिल्ह्यात ड्रग्ज विक्री सुरक्षितपणे व्हावी यासाठी तो आपल्या पदाचा वापर करत होता. या रॅकेटचे जाळे आंतरराज्य असण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, एका पोलिसाच्या अटकेमुळे खळबळ उडाली आहे.
