नेमकी घटना काय?
१४ फेब्रुवारी रोजी खळदच्या गोटेमाळ परिसरात एक तरुण नग्न आणि बेशुद्ध अवस्थेत दगडांच्या ढिगाऱ्यात आढळला होता. सुरुवातीला हा अपघात असावा असा संशय होता. सासवड पोलिसांनी त्याला तात्काळ ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र दुर्दैवाने २२ फेब्रुवारी रोजी त्याचा मृत्यू झाला. मृताचे नाव मिश्रीलाल छोटेलाल (वय ३३, रा. उन्नाव, उत्तर प्रदेश) असे असून, तो येथे का आणि कसा आला, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.
advertisement
शुक्रवारी (६ मार्च) आलेल्या शवविच्छेदन अहवालाने प्रकरणाला वेगळे वळण दिले आहे. मयताच्या डोक्यावर गंभीर इजा असून, ही हत्या असल्याचं समोर आलं आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी त्याला निर्जन स्थळी गाठून क्रूरपणे मारहाण केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याला दगडांच्या ढिगाऱ्यात फेकून दिले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक कुमार कदम अधिक तपास करत आहेत. या गुन्ह्याबाबत काही माहिती असल्यास ९०११०७९६२२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे.
