तक्रारदार ज्येष्ठ महिला रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास दांडेकर पूल परिसरातील जय महाराष्ट्र मित्रमंडळाजवळून जात होत्या. यावेळी तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले आणि आम्ही जुने दागिने किंवा पितळेच्या वस्तू नवीनसारख्या पॉलिश करून देतो, असे सांगून संवाद साधला. या भामट्यांनी त्यांच्याकडील एका खास द्रव पदार्थाचा वापर करून एक पितळाची वस्तू चमकवून दाखवली. त्या वस्तूचा लखलखाट पाहून महिलेचा त्यांच्यावर विश्वास बसला.
advertisement
महिलेचा विश्वास संपादन केल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या हातातील सोन्याच्या दोन बांगड्या पॉलिश करण्यासाठी मागून घेतल्या. महिलेने बांगड्या काढून देताच, चोरट्यांनी नजर चुकवून त्या स्वतःकडे ठेवल्या आणि क्षणात तिथून पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.
या घटनेची माहिती मिळताच पर्वती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. या टोळीने अशाच प्रकारे अन्य काही ठिकाणी फसवणूक केली आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी अनोळखी व्यक्तींच्या अशा भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
