बंडगार्डन पोलिसांच्या पथकाने सातारा जिल्ह्यातील कराड परिसरातून या दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं. पुणे स्टेशन परिसरात २९ जुलै रोजी चोरीची घटना घडली होती. एक पादचारी महिला पुणे स्टेशनच्या फलाट क्रमांक सहाजवळून शिवाजीनगरच्या दिशेने पायी जात असताना, या दोन अल्पवयीन चोरट्यांनी तिचं दोन लाख रुपये किमतीचं मंगळसूत्र हिसकावून नेलं. महिलेनं आरडाओरडा करताच, हे चोरटे गर्दीचा फायदा घेऊन पळून गेले होते. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
advertisement
Pune MHADA : पुणेकरांचं स्वप्न होणार साकार! या तारखेला 'म्हाडा'ची सोडत, घराची 'चावी' कोणाला?
गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी पुणे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. पोलीस कर्मचारी प्रकाश आव्हाड आणि सारस साळवी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी कराड परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने पथक तयार करून कराडमधून दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून चोरी केलेलं मंगळसूत्र आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अल्पवयीन आरोपींनी पुणे स्टेशन परिसरात आणखी काही पादचाऱ्यांची लूट केली असल्याची शक्यता असून, त्या दिशेने पोलीस तपास करत आहेत. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहायक आयुक्त संगीता अल्फान्सो-शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली.
