पुण्यातील स्वारगेट बलात्कार आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे पोलिसांनी अटक केली. कोर्टात हजर केल्यानंतर दत्ता गाडे याला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दत्ता गाडे याला शिरुरमधून त्याच्या मुळगावातून अटक करण्यात आली होती. आरोपी दत्ता गाडेला कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर त्याच्या वकिलांनी त्याच्या बचावासाठी अनेक दावे केले होते.
आरोपीच्या वकिलाने केली होती ही मागणी...
advertisement
आरोपी दत्ता गाडे याच्या वकिलांनी आरोपी आणि तरुणीवर संगनमताने संबंध झाल्याचा दावा केला होता. त्यांनी म्हटले की, पीडित तरुणीवर बलात्कार झालाच नाही. दोघांमध्ये जे झालं ते दोघांच्या संमतीने झालं होतं. दत्ता गाडे आणि ती मुलगी एकमेकांना एक महिन्यापासून ओळखतात असा दावा वकिलांनी केला होता. या दोघांचे कॉल रेकॉर्डस काढले तर समजेल, असंही आरोपीच्या वकिलांनी म्हटले होते. दत्ता गाडे हा पळून गेला नाही तर तो आपल्या गावी गेला. गावाला पोलीस छावणीचे स्वरुप आल्याने तो दडून बसला होता, अशी माहिती देखील आरोपीच्या वकिलांनी कोर्टात दिली होती.
आरोपी गाडे आणि तरुणी संपर्कात?
वकिलांनी नराधम आरोपी दत्तात्रय गाडे आणि तरुणी संपर्कात असल्याचा दावा केल्यानंतर पोलिसांनी पुरावे जमवण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी दत्ता गाडेच्या मोबाईलची तांत्रिक तपासणी केली. त्यानुसार पीडित तरुणी आणि गाडे हे एकमेकांच्या संपर्कात नसल्याचे तांत्रिक तपासणीत उघडकीस आले आहे. त्यामुळे आता गाडेचा बचाव आणखी कमकुवत होणार आहे. पोलीस ही बाब सुनावणीच्या वेळी कोर्टासमोर आणतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणात सीडीआर महत्त्वाचा ठरणार आहे.
गाडेला शुक्रवारी मध्यरात्री पुणे पोलिसांनी शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून अटक केली होती. नराधम गाडेला न्यायालयाने 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने पोलिसांकडून विविध बाजूंनी तपास केला जात आहे. गाडे याच्यासह शिवशाही बसचा चालक-वाहकाचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.