मिळालेल्या माहितीनुसार, संतोष पवार आणि सनी चव्हाण हे दोघे सोमाटणे फाटा येथील जुन्या पुणे–मुंबई महामार्गालगतच्या एका मैदानात क्रिकेट सामना पाहत बसले होते. हे दोघे एकमेकांसाठी पूर्णपणे अनोळखी होते आणि योगायोगाने एकाच कट्ट्यावर बसले होते. सामना पाहता पाहता त्यांच्यात कोणत्यातरी किरकोळ कारणावरून बाचाबाची सुरू झाली.
advertisement
या वादादरम्यान संतोष पवार याने आरोपी सनी चव्हाण याला आईवरून अश्लील शिवीगाळ केली. स्वतःच्या आईबद्दलचा तो एक शब्द सनीला सहन झाला नाही. संतापाने लालबुंद झालेल्या सनीने कसलाही विचार न करता तिथेच पडलेला एक मोठा दगड उचलला आणि संतोषच्या डोक्यावर जोरात प्रहार केला. घाव इतका भीषण होता की संतोषचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांची तत्काळ कारवाई
भरदिवसा साडेपाचच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी सनी चव्हाणला तातडीने ताब्यात घेतले.आईबद्दलचा अपमान काळजाला लागला आणि त्यातून एकाचा जीव गेला तर दुसऱ्याच्या हाती बेड्या पडल्या. केवळ क्षुल्लक वादातून झालेल्या या हत्येने संपूर्ण पिंपरी-चिंचवड हादरून गेले आहे.
