वाचा सविस्तर
गाडी क्रमांक 01215 (पुणे-नागपूर) ही गाडी 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजून 50 मिनिटांनी पुणे स्थानकावरून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 2 ऑक्टोबरला सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी नागपूरला पोहोचेल. नागपूरहून परतीसाठी गाडी क्रमांक 01216 (नागपूर-पुणे) ही 2 ऑक्टोबरच्या रात्री 11 वाजता सुटेल आणि 3 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4 वाजून 20 मिनिटांनी पुण्यात पोहोचेल. त्यामुळे नागपूरला जाणाऱ्या आणि परत येणाऱ्या प्रवाशांना या गाडीचा मोठा फायदा होणार आहे.
advertisement
या गाडीमध्ये एकूण 18 डबे असतील. यामध्ये 16 डब्यांना आरक्षणाची गरज नसल्याने प्रवाशांना सहज प्रवास करता येईल. मात्र गर्दी मोठी असल्याने रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आणि सुरक्षेच्या दृष्टीने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
गाडीचे असे असतील थांबे...
विशेष गाडीचा मार्गही मोठा आहे. पुणे स्थानकावरून सुटलेली ही गाडी दौंड, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा आणि अजनी या स्थानकांवर थांबून नागपूरला पोहोचेल.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या काळात हजारो भाविक पुण्यातून नागपूरकडे प्रस्थान करतात. अनेकांना नियमित गाड्यांमध्ये तिकीट मिळणे अवघड जाते. त्यामुळे ही विशेष गाडी सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. प्रवास सुरक्षित आणि सुरळीत व्हावा म्हणून सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आली असून स्थानकांवर आवश्यक ती व्यवस्था केली आहे.
नागपूरमधील दीक्षाभूमी ही बौद्ध अनुयायांसाठी श्रद्धास्थान मानली जाते. 1956 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथे बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्याची आठवण म्हणून दरवर्षी येथे लाखोंच्या संख्येने लोक जमा होतात. पुण्यातून निघणाऱ्या या विशेष गाडीमुळे अनेकांना वेळेत नागपूर गाठता येईल आणि या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होता येईल.