सिंहगडावर प्लास्टिक बंदी
किल्ल्यावरील अतिक्रमणाबाबत पुणे जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सिंहगडावर प्लास्टिक बंदीच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वनविभागाने सिंहगडावर प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. येत्या एक जूनपासून ही बंदी अमलात येणार आहे. गडावर जाणाऱ्या पर्यटकांना प्लास्टिकच्या बाटल्यांसाठी अनामत रक्कम (डिपॉझिट) भरावी लागेल. गडावरून परत येताना, कुठेही प्लास्टिकचा कचरा फेकताना आढळल्यास पर्यटकांवर थेट दंडात्मक कारवाई होणार आहे.
advertisement
PMP Bus Pune : आता वाहतुकीचे नियम मोडाल तर खबरदार, पीएमपी चालकांसानाही बसणार दंड, अशी आहे नियमावली
जूनपासून सिंहगडावरील पर्यटनाचा हंगाम सुरू होत आहे. वन विभागाचे सहायक वनसंरक्षक दीपक पवार यांनी रविवारी दुपारी गडावरील विक्रेत्यांची बैठक घेतली. यावेळी पुढील आठ दिवसात प्लास्टिक बंदीचे नियोजन करण्याची मुदत विक्रेत्यांना देण्यात आली आहे.
अतिक्रमण हटवणार
पुणे जिल्ह्यातील सिंहगडासह सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी वन विभाग आणि पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि अतिक्रमण हटवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सिंहगडावर बेकायदा बांधकाम करणाऱ्यांना नोटीस देण्यात आली आहे.