नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल मोहम्मद अन्सारी (वय ४२) हे वाहतूक पोलीस मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास ताथवडे अंडरपास जवळ वाहतूक नियमन करत होते. यावेळी संशयित आरोपी हर्षल सुपेकर याने तिथे येऊन अन्सारी यांच्यावर अचानक कात्रीने हल्ला केला. अन्सारी यांना जखमी करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अन्सारी यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
advertisement
कारवाईचा राग अन् सूडाची भावना
प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, काही दिवसांपूर्वी वाहतूक पोलिसानी हर्षल सुपेकर याच्यावर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली होती. या कारवाईचा प्रचंड राग त्याच्या मनात होता. याच रागातून त्याने अन्सारी यांना लक्ष्य केल्याचे बोलले जात आहे. वाकड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तातडीने हालचाली करत आरोपीच्या वडिलांना ताब्यात घेतले असून, मुख्य आरोपी हर्षलचा शोध सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाकड पोलीस ठाणे आणि रुग्णालयात धाव घेऊन अन्सारी यांच्या तब्येतीची विचारपूस केली. भररस्त्यात पोलिसावर अशा प्रकारे हल्ला झाल्याने पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
