अचानक चक्कर येऊन पडला
नागराज कोरे असं मृत तरुणाचं नाव असून तो आपल्या मित्रांसह राजगडवर ट्रेकिंग करण्यासाठी निघाला होता. नागराज आणि त्याचे सहकारी गुंजवणे दरवाजा या अत्यंत अवघड मार्गाने गडाची चढाई करत होते. गुंजवणे प्रवेशद्वाराच्या अगदी खाली असलेला टप्पा अतिशय बिकट मानला जातो. याच ठिकाणी चढाई करताना नागराज याला प्रचंड दम लागला आणि तो अचानक चक्कर येऊन खाली पडला, पण मित्रांनी त्याला धीर दिला.
advertisement
पुन्हा धाप लागली आणि छातीत तीव्र वेदना
सुरुवातीला तो खाली कोसळल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला आधार देऊन उठवण्याचा प्रयत्न केला. थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर नागराजने पुन्हा चढाई करण्यास सुरुवात केली. मात्र, काही अंतर पार केल्यानंतर त्याला पुन्हा धाप लागली आणि छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यानंतर काही क्षणातच तो पुन्हा जमिनीवर कोसळला आणि निपचित पडला, ज्यामुळे त्याचे मित्र घाबरले होते. मित्रांनी त्याला शुद्धीवर आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र नागराज कोणतीही हालचाल करत नव्हता.
हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नागराजचा मृत्यू
आसपासच्या लोकांनी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि मदतीसाठी लोक धावून आले. प्राथमिक अंदाजानुसार, गडाची अवघड चढाई करताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने या नागराजचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. गडावर चढताना अतिश्रमामुळे त्याच्या शरीरावर ताण आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला
गडावर येणाऱ्या पर्यटकांनी विशेषतः उन्हाळ्यात किंवा अवघड चढणीवर आपली शारीरिक क्षमता ओळखूनच ट्रेकिंग करावं, असं आवाहन आता केलं जात आहे. ऐन तारुण्यात एका मुलाचा असा मृत्यू झाल्याने कोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुरक्षित ट्रेकिंगसाठी आवश्यक खबरदारी घेणं आवश्यक आहे. जर शारिरीक कष्ट सहन होणार नसेल तर अशा गोष्टीपासून लांबच राहिलेलं बरं.
