पुणे : मागील काही दिवसांपासून राज्यात अवैध पद्धतीने वाळू उत्खनन करणाऱ्या माफियांनी उच्छाद मांडला होता. अखेरीस महसूल विभागाने धडक कारवाई केली आहे. पुण्यातील 3 तहसीलदार, ४ मंडल अधिकारी आणि २ तलाठ्यांना थेट निलंबित करण्याची कारवाई राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात मंगरूळ इथं वाळू माफियांनी धुडगूस घातला आहे. अवैध उत्खनन प्रकरणी अखेरीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कारवाईचे थेट आदेश दिले होते. अखेरीस महसूल विभागाने 90 हजार ब्रास अवैध उत्खनन प्रकरणी ३ तहसीलदार, ४ मंडल अधिकारी आणि 2 तलाठ्यांना निलंबित केलं आहे.
advertisement
काय आहे प्रकरण?
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील मंगरूळ इथं महसूल विभागाच्या नियमांचे आणि वन कायद्याचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर अवैध गौण खनिज उत्खनन आणि वृक्षतोड झाल्याचे प्रकरण डिसेंबर २०२४ मध्ये उघडकीस आलं होतं. गट क्रमांक ३६, ३७, ४१ आणि ४२ मधील वनक्षेत्रात रॉयल्टी न भरता अनधिकृतपणे माती, मुरूम आणि डबरचे उत्खनन करण्यात आलं होतं. ४० ते ९० हजार ब्रासपर्यंत गौण खनिजाचं उत्खनन झालं होतं. या अवैध उत्खनन प्रकरणी जबाबदार असलेल्या तीन तहसीलदार, चार मंडल अधिकारी आणि दोन तलाठी यांना तत्काळ निलंबित करण्यात आलं आहे. स्थानिक आमदारांनी या विषयावर विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यानंतर महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
