तन्मय पेंडसे सांगतात की, “जे घडलं ते बदलू शकत नाही, पण पुढे अशा घटना कमी व्हाव्यात यासाठी प्रयत्न करता येतात, या भावनेतून रोड सेफ्टीचा अभ्यास सुरू केला. कॉमर्स पार्श्वभूमी असतानाही अपघातांची कारणे, मृत्यूदर, आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था यांचा सखोल अभ्यास करून एक संशोधन अहवाल तयार केला. अपघातांची तीव्रता कमी करण्यासाठी मेडियनमध्ये ‘बाय-फ्रेंडली रूफ’ किंवा सुरक्षित बॅरिअर असावेत, जेणेकरून वाहनांची धडक झाल्यास नुकसान कमी होईल,” अशी शिफारस त्यांनी केली.
advertisement
हेल्मेट न घातल्याची चूक अन् आयुष्यभराची जखम, गुप्ता यांनी घेतला धडा, आता करतात हे काम
अपघातानंतर त्वरित वैद्यकीय मदत मिळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने ट्रॉमा केअर सेंटरची गरज त्यांनी अधोरेखित केली. जखमींना ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळावेत यासाठी रुग्णवाहिका आणि मेडिकल नेटवर्क मजबूत असावे, यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. याशिवाय, एक्स्प्रेसवेवर प्रभावी साईनएजेस लावणे, वेगमर्यादा आणि सुरक्षित ड्रायव्हिंगबाबत जनजागृती करणे, तसेच काही प्रसिद्ध कलाकारांच्या आवाजात संदेश रेकॉर्ड करून प्रसारित करणे अशा उपक्रमांनाही त्यांनी सुरुवात केली.
2016 साली त्यांनी स्वतःच्या खर्चातून टोल नाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. अपघात घडल्यास तातडीने माहिती मिळावी आणि मदत पोहोचवता यावी, हा त्यामागचा उद्देश होता. विविध उपाययोजनांसाठी आतापर्यंत सुमारे 15 लाख रुपये त्यांनी वैयक्तिक पातळीवर खर्च केले आहेत.
अक्षयमार्ग संस्थेच्या माध्यमातून ते गेली अनेक वर्षे अपघातग्रस्तांना मदत, जनजागृती आणि तातडीची सेवा देत आहेत. शेकडो जखमींना वेळेत मदत मिळवून देण्यात त्यांच्या कार्याचा मोलाचा वाटा आहे. वैयक्तिक वेदनेतून उभे राहून इतरांचे जीव वाचवण्याचे हे मिशन आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.





