नेमकी घटना काय?
सातारा येथून आलेला टेम्पो (MH 12 BT 3568) सिंहगड घाटातून खाली उतरत होता. धारजाई चौकाजवळ असलेल्या तळई उद्यानापुढील एका धोकादायक वळणावर समोरून पर्यटकांचे वाहन आले. या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले आणि वाहन थेट दुभाजकाला धडकून दरीत कोसळले.
advertisement
मृत्यूच्या दाढेतून जिवंत परतले
टेम्पो दरीत जात असताना दोन जणांनी प्रसंगावधान राखून चालत्या वाहनातून बाहेर उड्या मारल्या. इतर दोघे जण टेम्पो दरीत एका झाडाजवळ अडकला असताना बाहेर पडले. या थरारामुळे पर्यटकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. अपघातात चारही जण किरकोळ जखमी झाले असून टेम्पोचा मात्र चक्काचूर झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाचे तानाजी भोसले, वनविभागाचे समाधान पाटील आणि पोलीस पाटील घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पर्यटकांच्या गर्दीमुळे घाटात वाहन चालवताना अत्यंत काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र, या इतक्या भीषण अपघातात आतील प्रवासी ज्या पद्धतीने बचावले, त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
