पुणे : आयुष्याच्या वळणावर शिक्षकांचे मार्गदर्शन खूप मोलाचे असते. हेच शिक्षक आपल्याला आयुष्यात येणाऱ्या संकंटाशी संघर्ष करायला शिकवतात. मात्र, आता पुण्यातील काही शिक्षक हे आपल्या अस्तित्वासाठी लढत असताना पाहायला मिळत आहे. पवित्र पोर्टलद्वारे रयत शिक्षण संस्थेमध्ये 801 उमेदवार निवड होऊन आज सात महिने कालावधी उलटला तरी त्यांना नियुक्ती मिळालेली नाही.
advertisement
हे सर्व वंचित 801 उमेदवार पवित्र पोर्टलद्वारे घेतलेल्या TAIT परीक्षेतील उच्च गुणवाताधारक उमेदवार आहेत. मात्र, तरीही त्यांना अद्याप नियुक्ती मिळालेली नाही. त्यासाठी त्यांनी आता आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत, याचबाबत लोकल18 चा स्पेशल रिपोर्ट.
पवित्र पोर्टलमार्फत रयत शिक्षण संस्थेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 7 महिने उलटले. तरी अद्याप नियुक्त्या देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे राज्यभरातील वंचित उमेदवारांना लवकरात लवकर आस्थापना बदलून नियुक्ती मिळावी, या मागणीसाठी पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण अन्नत्याग उपोषण करण्यात येत आहे. या आंदोलनाला राज्यभरातून हजारो उमेदवार उपस्थित राहत आहेत.
महाराष्ट्र राज्य शासनाने शिक्षक भरतीसाठी सुरू केलेल्या पवित्र पोर्टल माध्यमातून घेण्यात आलेल्या, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच, टेट परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात 11085 शिक्षक उमेदवारांची विनामुलाखत निवड यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली. त्यातील बहुतांश शिक्षकांना राज्यातील जिल्हा परिषदा व इतर संबधित आस्थापनांनी नियुक्त्या दिल्या. मात्र, उच्च गुण असूनही रयत शिक्षण संस्थेत निवड झालेले शिक्षक नियुक्तीपासून वंचित आहेत.
पवित्र पोर्टलवर रयत शिक्षण संस्थेने प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा एकूण 814 जागांची जाहिरात दिली होती. त्यातील 801 उमेदवारांची शासनाने शिफारस केली आहे. तरी पण, रयत संस्थेने निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी तसेच नियुक्ती संदर्भात अद्याप कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत.
पहिल्या टप्प्यातील विनामुलाखत निवड यादीतील उमेदवार नियुक्तीपासून वंचित आहेत. आम्ही उच्च गुण प्राप्त केले तरीदेखील आमच्यावर कोर्टात, आयुक्तालयात, संस्थेत फेऱ्या मारण्याची नामुष्की ओढवली आहे. 801 कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE) जवळपास 25 हजार विद्यार्थ्याचा शिक्षण हक्क धोक्यात आहे. सदर उमेदवारांना आस्थापना बदलून तत्काळ नियुक्ती झाल्यास संबंधित विद्यार्थी आणि शिक्षकांना न्याय मिळेल, अशा भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या आहेत.
मुबंईतील नोकरी परवडेना, आज गावी दिवसाला कमावतोय 7 ते 8 हजार रुपये नफा, तरुणानं करुन दाखवलं!, VIDEO
गुणवत्ताधारक उमेदवारांच्या मागण्या काय -
- पवित्र पोर्टल 2022 मार्फत रयत शिक्षण संस्थेसाठी शिफारस पात्र केलेल्या पण 7 महिन्यापासून नियुक्तीपासून वंचित असलेल्या एकूण 801 उमेदवारांना तत्काळ आस्थापना बदलून नियुक्तीचे आदेश देण्यात यावेत.
- नियुक्तीस पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळेपर्यंत किमान वेतन कायद्यानुसार मानधन मिळावे.
- निवड यादी प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते नियुक्ती मिळेपर्यंत जेवढा कालावधी लागेल तेवढा कालावधी शिक्षणसेवक कालावधीमधून कमी करण्यात यावा.
- वर्षानुवर्षे शिक्षक भरतीत पडलेला खंड आणि वयोमयदिचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शिक्षणसेवक रद्द करावे. (जवळपास 40 च्यावरील शिक्षकाचे वयोमान गेले आहे, याचा विचार करून) आस्थापना बदलून नियुक्ती देण्याची मागणी समस्त गुणवत्ता धारक विद्यार्थी करीत आहेत. या मागणीसाठी 16 दिवस बेमुदत धरणे आंदोलन पुण्यातील आयुक्त कार्यालय येथे केले. परंतु वंचित उमेदवारांच्या मागण्या मान्य न झाल्याने काल 23 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण केले जात आहे. आस्थापना बदलून नियुक्ती मिळेपर्यंत हे उपोषण केले जाणार आहे, अशी माहिती उमेदवार अर्चना पोतदार यांनी दिली आहे.