लोणावळा: सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. मंगल कार्यालय, लॉन्स आणि रिसॉर्टवर सध्या लग्न सोहळ्यासाठी चांगलीच गर्दी जमत आहे. अशातच लग्न सोहळ्यात चोरीचे प्रकारही वाढत चालले आहे. पुण्यात अशीच एक घटना घडली आहे. लोणावळा इथं लग्नकार्यामध्ये तब्बल ९ लाख ९४ हजार रुपये किंमतीच्या दागिन्यांवर दोन चोरांनी डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान कोटा येथील कुटुंब आपल्या मुलीच्या लग्न कार्यासाठी लोणावळा येथील ट्रिझर आयलँड या रिसॉर्टमध्ये थांबले होते. वधू पक्षाकडून नातेवाईकांसाठी रिसॉर्टमध्ये वेगळ्या खोलीची व्यवस्था करण्यात आली होती, अशातच लग्न गोंधळाचा फायदा घेऊन दोन चोरांनी संधी साधली आणि ७ लाख रुपये किंमतीचे नवरीचे दागिने तसंच २ लाख रुपये रोकड असा असा एकूण ९ लाख ९४ हजारांच्या ऐवज चोरांनी लंपास केला.
नवरीचे दागिने चोरीला गेल्याची घटना समजताच एकच खळबळ उडाली. या चोरी प्रकरणी कोटा राजस्थान येथील राहणारे सुमित्रा करेलिया यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर लोणावळा पोलिसांनी रिसॉर्टमध्ये धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असता संबंधित रिसॉर्टमध्ये लागलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी तपासले आहेत.
त्यानुसार दोन संशयित इसमानी नवरीचे दागिने तसंच रोख रक्कम चोरी केल्याची बाब प्राथमिक तपासात उघड झाली आहेत, पोलिसांच्या हाती लागलेल्या CCTV च्या आधारे लोणावळा ग्रामीण पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहे. तसंच आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथके रवाना केली आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास लोणावळा पोलीस करत आहे.
