नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वखार महामंडळाजवळ मोजेश शेखापुरे या तरुणावर पूर्ववैमनस्यातून गोळीबार करण्यात आला होता. साहिल महेंद्रसिंग चव्हाण आणि बालाजी रामजी उमाप यांनी त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने मोजेशला लक्ष्य केले. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते, ज्याबाबत मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
advertisement
नांदेड सिटी परिसरातून आरोपींना बेड्या
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरू केला होता. तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी नांदेड सिटी गेट परिसरात लपून बसल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसराची नाकेबंदी करून सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने अचानक झडप घालून कोणतीही संधी न देता दोघांना ताब्यात घेतले.
विदेशी पिस्तूल आणि मुद्देमाल जप्त
आरोपींची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे विदेशी बनावटीचे पिस्तूल आणि काही जिवंत काडतुसे मिळून आली. तसेच, गुन्ह्यासाठी वापरलेली दुचाकीही पोलिसांनी हस्तगत केली आहे. प्राथमिक चौकशीत या गुन्ह्यात अन्य काही आरोपींचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून, पोलीस आता त्यांच्या शोधात आहेत. अटक केलेल्या दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. आरोपींचा पीडित तरुणासोबत नेमका काय वाद होता? याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. घटनेचा तपास सुरू आहे.
