वसंत मोरे - प्रभाग क्रमांक 38 इ
फक्त वसंत मोरेच नाही तर वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे देखील यंदाच्या महापालिका निवडणुकीच्या रिंगणार उतरणार आहे. रुपेश मोरे याने सोशल मीडियावर पोस्ट करत याची घोषणा केली. वसंत मोरे प्रभाग क्रमांक 38 इ तर रुपेश मोरे प्रभाग क्रमांक 40 ड मधून निवडणूक लढवणार आहे. आम्ही तयार आहोत पुन्हा एकदा जनतेच्या सेवेसाठी, असं रुपेश मोरे याने पोस्ट करत म्हटलं आहे.
advertisement
15 वर्ष तुझ्या अंगावर गुलाल...
ऐन दिवाळीत मुलाच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधत वसंत मोरेंनी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत आपला मुलगा महापालिका निवडणुकीत उभा राहणार असल्याचं जाहीर केलं होतं. आगामी निवडणूक बाप नाही तर लेक लढवणार असल्याचं वसंत मोरे यांनी म्हटलं होतं. सतत 15 वर्ष तुझ्या अंगावर माझ्या प्रत्येक महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयाचा गुलाल पडलाय पण यावेळी तुझ्या निवडणुकीत माझ्या अंगावर गुलाल पडणारच, असं वसंत मोरे म्हणाले होते.
खासदार ते पुन्हा नगरसेवक...
मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत बिनसल्यानंतर वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकला होता. वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेचा राजीनामा दिला अन् वंचित बहुजन आघाडीशी हातमिळवणी केली. पण वसंत मोरे यांना लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी वसंत मोरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीत वसंत मोरे यांनी हडपसर मतदारसंघातून निवडणूक लढवली खरी पण वसंत मोरे यांना यश आलं नाही अन् आमदार होण्याचं स्वप्न पुन्हा अपूरं राहिलं. अशातच आता वसंत मोरे पुन्हा महानगरपालिकेच्या निवडणुकीत शड्डू ठोकणार आहेत.
पुण्यात निवडणुकीची जोरदार तयारी
दरम्यान, पुण्यात महापालिका निवडणुकीची तयारी जोरदार होताना दिसत आहे. पुण्याच्या अनेक भागात दिवाळीच्या निमित्ताने प्रचार देखील सुरू झाला. आता ठिकठिकाणी पोस्टर लावले जात असल्याचं देखील समोर आलं आहे. अनेकांना मोफत कंदिल वाटले जातायेत. तर अनेकांना दिवाळीनिमित्त उठणं, साबण तसेच अनेक वस्तू वाटल्या जात आहेत. त्यामुळे आता चित्र स्पष्ट होताना दिसत आहे.
